रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ८ (भाग २)
मायलोफायब्रोसिस (Myelofibrosis)
(अस्थिमगजाचा आतील भाग जाडसर होऊन पेशी निर्मितीत अक्षम होण्याचा विकार)
ह्या विकाराचे निदान कसे केले जाते?
रक्त तपासणीत विकृत आकाराच्या तांबड्या रक्तपेशी दिसून येतात. ह्या सोबत अस्थिमगज तपासणीतल्या नमुन्याची जाडसर सदोष उतींसाठी तपासणी केली जाते, (Bone Marrow) सोबतच रुग्णाच्या अस्थिमगजातल्या आतील हाडाचीही तपासणी करावी लागते
(याला Trephine म्हणतात अस्थिचा सुईतून काढलेला लांबट तुकडा) यामुळे अस्थिमगजाचा पेशी निर्मिती करणारा भाग किती जाडसर होवून अक्षम झाला आहे जे ह्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे याची सांगोपांग माहिती मिळते. ही तपासणी त्या ठिकाणी स्थानिक भूल (Local Anaesthesia) देवून केली जाते.·
'मायलोफायब्रोसिस' वर कशारितीने उपचार केला जातो?
ज्या रुग्णांना तीव्र स्वरूपाचा पंडुरोग (Anaemia) नाही आणि इतर कुठलीही लक्षणे नाहीत अशांची बाह्यरुग्णविभागात (OPD) नियमितपणे तपासणी केली जाते व त्यांना कुठलाही उपचार सुचविला जात नाही कारण त्याची गरज नसते.
· १) रक्त देणे - हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी नेहमी केला जाणारा उपचार यातही केला जातो.
· २) औषधोपचार - काही औषधे परिणामकारक असतात ती आपले रक्तविकार तज्ञ, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून सांगतात.
· ३) प्लीहा निष्कासन शस्त्रक्रिया (Splenectomy) - काही रुग्णांत प्लीहा काढून टाकावी लागते.
· ४) अस्थिमगज रोपण - हे ज्यांना सुयोग्य अस्थिमगज दाता मिळतो व ज्यांचे अस्थिमगज एकमेकांशी परिपूर्ण जुळते त्या रुग्णांत अस्थिमगज रोपण केले जाते.
· या आजाराची फलनिष्पत्ती (Outcome) काय?
'मायलोफायब्रोसिस' च्या विकाराचा मार्ग हा अतिशय बदलता असतो ज्या रुग्णांत हा विकार सौम्य स्वरुपात आहे व व्याधी पटकन विकृत रूप घेत नाही अशांमध्ये त्यांच्या नेहमीच्या कार्यात व जीवनात व्यत्यय निर्माण करण्याची गरज नसते. इतर रुग्णांत वारंवार नियमित रक्त देण्याची गरज भासते शेवटी फार थोड्या 'मायलोफायब्रोसिस' च्या रुग्णांना रक्ताच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते.
आपण हा विकार असलेल्या इतर लोकांशी ही संवाद साधू शकता.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कर्करोग तज्ञ)