रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ९ (भाग १)
पॉलीसायथेमिया व्हेरा (Polycythaemia Vera)पॉलीसायथेमिया व्हेरा अर्थात तांबड्या रक्त पेशींचे आधिक्य
'पॉलीसायथेमिया' म्हणजे काय?
साध्या, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एक अशी रक्त व्याधी ज्यात तांबड्या पेशींची(RBC) संख्या अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त असते हे आपल्याला एक साध्या रक्त चाचणीद्वारे(CBC) कळून येते. हिमोग्लोबिन मोजले असता तेही जास्त आढळते. तसे हिमोग्लोबिन वाढण्याची बरीच कारणे आहेत.
सर्वसाधारणपणे आढळून येणाऱ्या कारणांत धुम्रपान, हृदयाचा जन्मापासूनचा आजार, फुफ्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार इ. ह्या शिवाय अस्थिमगजात(Bone Marrow) (जेथे सर्व रक्तपेशींची निर्मिती होते) प्रमाणापेक्षा अधिक या पेशींचे निर्माण होते. ह्यालाच पॉलीसायथेमिया व्हेरा अथवा मराठीत लालरक्तपेशी आधिक्य असे म्हणू शकतो.
· तांबड्या रक्तपेशी प्रमाणाधिक्य ( पॉलीसायथेमिया व्हेरा)
हा एक असा रक्तविकार असून ज्यात बेसुमार तांबड्या पेशींची निर्मिती अस्थिमगजातून (Bone Marrow) होते. ह्यामुळे रक्त घट्ट होते. काहीवेळा ह्या सोबत पांढऱ्या पेशींची व रक्तबिंबिकांचीही बेसुमार संख्या वाढू शकते. प्रमाणाबाहेर पेशींची संख्या वाढल्याने त्या प्लीहेत गोळा होतात व परिणामी प्लीहेचा आकार वाढतो. पेशींची संख्या रक्तात जास्त झाल्याने रक्त प्रवाहित राहण्याच्या समस्या उद्भवतात व रक्त वाहिन्यांत गुठळ्या तयार होतात ह्यामुळे हृदयविकार (Heart Attack) / पक्षाघात (Stroke) सारख्या गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होवू शकतात. ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांत हृदयविकाराची व पक्षाघाताची शक्यता जास्त असते व ह्या व्याधीचे रुपांतर रक्ताच्या कर्करोगात (Myeloid Leukemia) किंवा अकारण जुनाट (Chronic Idiopathic) मायलोफायब्रोसिस( एक अस्थीमगज व्याधी ) यात होते.
ह्याची कोणकोणती चिन्हे व लक्षणे रुग्णांत दिसून येतात?
पॉलीसायथेमिया व्हेरा या रक्तव्याधीत शक्यतो डोकेदुखी व डाव्या फासळीच्या खाली गच्च्पणा जाणवतो, संपूर्ण अंगाला खाज येते( खास करून जर गरम पाण्याने आंघोळ केली असेल तर), घेरी आल्यासारखे वाटते.
ह्या आजारात बहुधा सुरुवातीला कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. ही व्याधी काही वेळा नेहमीच्या रक्त तपासणी (CBC)नंतर अचानक दिसून येते.व ह्यात तांबड्या पेशी(RBC) वाढलेल्या आढळतात. वर सांगितलेली लक्षणे इतर आजारांतही दिसू शकतात
ह्या रक्तव्याधीचे निदान कसे केले जाते?
अस्थिमगजतपासणी व जनुकीय चाचणी (JAK -2) ह्या पॉलीसायथेमिया व्हेरा या रक्तव्याधीसाठी केल्या जावू शकतात. या चाचण्या पॉलीसायथेमिया व्हेरा होण्याच्या नेहमीच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर ठरवल्या जातात. रुग्णाला अस्थिमगज तपासणी(Bone Marrow Test) सोबतच ह्या तपासणीबद्दल सांगितले जाते.
क्रमशः
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – ( रक्तविकार व कर्करोग तज्ञ )