रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ९ (भाग २ )
पॉलीसायथेमिया व्हेरा (Polycythaemia Vera)
पॉलीसायथेमिया व्हेरा अर्थात तांबड्या रक्त पेशींचे आधिक्य
पॉलीसायथेमिया व्हेरा या रक्तव्याधीवर कसे उपचार केले जातात?
जर पॉलीसायथेमिया व्हेरा ही व्याधी कुठल्यातरी दुसऱ्या वैद्यकीय कारणांचा परिणाम म्हणून झाली असेल (ज्यात तांबड्या पेशींची संख्या प्रमाणापेक्षा अधिक वाढते) अशावेळी मुळकारणांचा नायनाट अथवा नियंत्रण केल्यास ही व्याधी आटोक्यात येवू शकते. धुम्रपान बऱ्याच व्यक्तींत आढळून येणारे प्रमुख कारण आहे व ते त्वरित थांबायला हवे.
जर ही व्याधी अस्थिमगज अतिकार्यक्षमझाल्याने (जास्त पेशी निर्मितीमुळे)(Over Production) होत असेल अशावेळी त्यावर विशिष्ट उपचार आहेत जे व्याधीच्या तीव्रतेवर व वय सोबत असणारे इतर धोकादायक घटक ह्या सगळ्यांचा विचार करून केले जातात. हे अधिक प्रभावीपणे आपले रक्तविकारतज्ञ सांगू शकतील.
सर्वसाधारणतः खालील उपचार पद्धतींचा यात उपयोग केला जातो :-
१) रक्तदान - यात ठराविक अंतराने लक्षणे व रक्त तपासणीच्या आधाराने रुग्णास रक्तदान करायला सांगितले जाते. काही रुग्णांत यामुळे चक्कर आल्यासारखे वाटू शकते व काहींना थोड्याश्या आरामाची व पातळ द्रव पदार्थ तोंडाने घेण्याची गरज लागू शकते. काही रुग्णांना शिरेवाटे सलाईनची गरज लागते.
२) हायड्रोक्सीयुरिया - हा एक असा रसायानोपचारातला घटक आहे, ज्याचा अस्थिमगजाची वाढलेली कार्यक्षमतेवर नियंत्रण मिळवण्याकरता उपयोग होतो. हे कॅप्सुल च्या स्वरुपात असते व दिल्यानंतर नियमित रक्त तपासणी करून त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. वैद्यकीय निरीक्षणाखेरीज हे औषध दिले जात नाही कारण विशेष संभाव्य दुष्परीणामांचा अभ्यास व त्यावर उपचार करणारे तज्ञ हे औषध देतात.
३) इंटरफेरॉन (Interferon) - या इंजेक्शनमुळे अत्याधिक प्रमाणात होणारे पेशी विभाजन व वाढ नियंत्रित केली जाते. हे महाग असून याचे विविध दुष्परिणामही दिसून येतात.
* पॉलीसायथेमिया रुग्णांच्या भावी आयुष्याचे काय?
जर एखाद्या व्यक्तीस उपरोक्त व्याधी असेल तर (अस्थिमगजाची वाढीव कार्यक्षमता) फार कमी लोकांत या व्याधीचे रुपांतर कर्करोगात होते व हे वाढत्या वयाच्या प्रमाणात असते. काही वेळा या व्याधीचे मायलोफायब्रोसिस (ज्यात प्लीहेचा आकार वाढतो व पेशींची संख्या कमी होते) मध्ये होते. यात उद्भवणाऱ्या धोक्यांची तपशीलवार चर्चा भविष्यात कधीतरी पुन्हा करूया.
या शिवाय आणखी काही माहिती हवी असल्यास आपले रक्तविकारतज्ञ ती देतीलच.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)