रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १०(भाग २)
सिकलसेल (Sickle Cell)
सिकलसेलचा आजार (अर्थात तांबड्यापेशी विळ्याच्या पात्यासारख्या (चंद्रकोरीप्रमाणे) होवून उद्भवणारा आजार)
त्यातील काही कारणे : -
१. अंग गारठणे (गारव्यामुळे)
२. निर्जलीकरण - (Dehydration) (शरीरात पाण्याचे प्रमाण खूप कमी होणे)
३. शारीरिक तपमानात झालेला अचानक बदल (कमी वा जास्त)
४. प्राणवायू (Oxygen) चा अभाव
५. जंतुसंसर्ग (यात सर्दीसारखे आजार सुद्धा ! )
६. अपुरे / अवेळी जेवणे, वा जेवलेले अन्न शरीर कार्यक्षम ठेवण्याइतके नसणे. (अपुरे जेवण)
७. शारीरिक श्रम
८. मानसिक तणाव
सर्वसाधारणपणे ह्या वेदना व्हायला काही विशिष्ट कारणेच हवीत असे नसते. ह्या होतात इतक्याच काय ते. ह्या आजाराचा त्रास व्यक्तीगणिक कमी किंवा अधिक होवू शकतो. एकाच कुटुंबातील दोन सिकलसेलग्रस्त व्यक्तींचा वेदनेचा अनुभव देखील वेगवेगळा असतो. कोणत्या कारणांनी एखाद्या व्यक्तीला त्रास होईल व त्याच कारणाने दुसऱ्या व्यक्तीस अजिबात त्रास होणारही नाही असे असते.
· सिकलसेलग्रस्त व्यक्ती वेदनेने हैराण असल्यास त्याची आपण कशी मदत करू शकू?
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णांना धीर देण्याची व सहानुभूतीपूर्वक सांत्वना देण्याची गरज असते (जेवढी म्हणून आपण देवू शकू) जर रुग्ण आपले मुल असेल तर अशा पालकांसाठी अशा आणीबाणीच्या प्रसंगात कशाप्रकारे काळजी घ्यावी यासाठी पुस्तक आहे ज्यायोगे अशा प्रसंगांना धीराने तोंड देता येते व आलेल्या परिस्थितीवर मात करता येते.
· 'सिकलसेल' या व्याधीची काही इतरही लक्षणे असतात का?
पंडुरोग (Anaemia) - सर्वसाधारण व्यक्तींत तांबड्यापेशी १२० दिवस शरीरात जगतात हेच प्रमाण सिकलसेलच्या आजारात घसरून सुमारे ५ ते ३० दिवस इतके खाली येते. ह्या 'सिकलसेलग्रस्त' रुग्णांत तांबड्यापेशींचे आयुर्मान घटल्याने यांचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होवून हे 'पंडुरोगग्रस्त'(Anaemic) देखील असतात. पंडुरोग असल्याकारणाने सिकलसेलग्रस्त व्यक्ती पटकन थकतात. रुग्ण विद्यार्थी असतील तर वर्गात पेंगुळतात व काम करणारे असतील तर तेथेही हे सुस्त असतात त्यामुळे त्यांची अभ्यासात किंवा कामात एकाग्रता साधली जात नाही. हे रुग्ण निस्तेज दिसतात व रोजच्या शारीरिक मामुली श्रमाने व कार्याने यांना धाप लागते. सामान्य माणसांपेक्षा यांना थंडी जास्त जाणवते इतर सामान्य जनांपेक्षा यांच्या पेशी लवकर - लवकर मारल्या जात असल्यामुळे (प्लीहेत) पेशींतील रंगद्रव्य रक्तात येवून खास करून यांची त्वचा व डोळे पिवळसर दिसतात.(काविळीत होते तसे) जरी यांना कुठलाही त्रास नसला तरी देखील !
जंतुसंसर्ग (Infections) - सिकलसेलग्रस्त रुग्णांत शरीराच्या रोग प्रतिकारक्षमतेचा व्यवस्थित विकास न होवू शकल्याने ह्यांना जंतुसंसर्ग पटकन होतो त्यात लहान वयात अशा जंतूसंसर्गाचे प्रमाण अधिक असते व योग्यवेळी त्यावर प्रभावी औषधोपचार केला गेला नाही तर व्याधी लवकर विकोपास जाते किंवा वर सांगितलेली तीव्र वेदनादायी आणीबाणीही उद्भवू शकते.
· सिकलसेलच्या व्याधीत सर्वसाधारणपणे काय उपचार केला जातो?
ह्या व्याधीवर कोणताही विशिष्ट उपचार नाही. या व्याधीवर दिसून येणाऱ्या लक्षणानुसार उपचार केले जातात. जंतूसंसर्ग होवू नये म्हणून वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून नेहमीची प्रचलित प्रतिजैविके (Antibiotics) रोज एकदा किंवा दोनदा दिले जातात. ज्या रुग्णांत जंतुसंसर्ग वारंवार होतो अशा रुग्णांत काही डॉक्टर बालपणापासूनच 'फॉलीकॲसिड'व खनिजयुक्त जीवनसत्वांच्या च्या गोळ्या / औषधे देतात ज्याने तांबड्या रक्तपेशी तयार व्हायला मदत होते.
सिकलसेलग्रस्त बालकांत रोगप्रतिकारयंत्रणा पुरेशी विकसीत होत नसल्याने त्यांना बालरोगतज्ञांनी आखून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण लसी द्याव्यात ह्याखेरीज ८ ते २४ महिन्यांदरम्यान (Pneumovax) न्युमोनिया संरक्षक लस ही द्यावी ज्यायोगे अधिक संरक्षण मिळू शकेल. त्यानंतर, दर ५ वर्षांनी ही लस देत राहावी अगदी प्रौढावस्थेतही !
·'सिकलसेलग्रस्त' या व्याधीवर कायमस्वरूपी काही इलाज आहे?
होय ! ह्याला अस्थिमज्जारोपण (Bone Marrow Transplant) करून हा आजार घालवता येतो. सिकलसेलव्याधी नसलेल्या व जुळणाऱ्या (Matching) भावाची अथवा बहिणीची किंवा बाहेरच्या दात्याची (Doner) अस्थिमज्जा रोपित करून ही व्याधी कायमची जाते.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे –
(रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)