Nashik
08048036867
+917774073485

रुग्णजागृती ज्ञानमाला -- पुष्प ...

रुग्णजागृती ज्ञानमाला -- पुष्प १ “ अनिमिया ” (Anaemia ) – भाग १ “ अनिमिया ” – मराठी अर्थ – पंडुरोग किंवा रक्ताल्पता पंडुरोग म्हणजे नेमके काय ? पंडुरोग म्हणजे रक्तातील तांबड्या पेशींची संख्या सामान्य प्रमाणापेक्षा कमी असणे किंवा रक्तातील तांबड्या पेशीतले हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रत्येक पेशीत ( सामान्य निर्धारित प्रमाणापेक्षा ) कमी असणे होय. पंडुरोग म्हणजे शरीर पांढरे / पिंगट पडणे . पंडुरोगात साधारणत: कोणती लक्षणे दिसून येतात ? यात बरीच लक्षणे शरीरातील प्राणवायू ( अर्थात ऑक्सिजन ) च्या घटलेल्या प्रमाणामुळे दिसतात. प्रामुख्याने पटकन किंवा थोड्याशा श्रमाने किंवा चालल्याने थकवा , गळाल्यासारखे वाटणे ( गलीतगात्रता), तोल गेल्यासारखे जाणवणे , तसेच वारंवार धाप लागणे हि लक्षणे दिसून येतात. ( क्वचित काही )रुग्णात डोकेदुखी , छातीत धडधडणे ( हृदयगती वाढणे ) , चवीत बदल व कानात सुं-सुं असा आवाज होणे ( Tinnitus ) ही लक्षणेदेखील दिसून येतात.यात व्यक्ती पिंगट निस्तेज दिसते . इतरही काही लक्षणे पंडुरोगाच्या स्वरूपानुसार तसेच मूळ कारणानुरूप दिसून येतात. पंडुरोग होण्याची कोणकोणती कारणे आहेत ? लोहाची कमतरता हे भारतातील पंडूरोगात आढळून येणारे प्रमुख कारण आहे. जर आपण संतुलित आहार घेत असू तर त्यातुन शरीरास आवश्यक इतके लोह मिळतेच. खालील काही अवस्थांमध्ये लोहाची कमतरता होते यात – १. गर्भावस्थेत किंवा बालपणात शरीराला नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात लोहाची गरज असते व ही मागणी नेहमीच्या आहारातून पूर्ण होत नाही अशावेळी बाहेरून (गोळ्या किंवा पातळ औषधांद्वारे ) ही गरज भागवावी लागते किंवा आहारात अधिक लोहयुक्त पदार्थांचा विशेष समावेश करावा लागतो असे न केल्यास पंडूरोगाची शक्यता वाढते. २. ऋतुस्त्रावाधीक्य ( पाळीत अंगावर जास्त जाणे ) – मासिक पाळी दरम्यान जर स्त्रावाचे प्रमाण अधिक असेल तर अशा प्रत्येक मासिकपाळी गणिक लोहाचे प्रमाण घटत जाते व त्याचा तुटवडा आहारातून भरून निघाला नाही तर पंडुरोग होतो . ३. लोहाचे कमी प्रमाणात होणारे शोषण – बऱ्याच रुग्णांमध्ये आतड्याच्या आजारांमुळे संतुलित आहार घेवून देखील पंडुरोग आढळतो याचे कारण लोहाचे आतड्याद्वारे योग्य प्रमाणात शोषण होत नाही . यांत क्रोन्स डिसीज ( एक आत्रविकार ) किंवा इतर काही आतड्यांचे रोग आढळतात . काही वेळा रुग्णाच्या नकळत आतल्या आत आतड्यांत रक्तस्त्राव होत राहतो . काही वेळा सातत्याने किंवा अधून-मधून शौचाद्वारे रक्त जात राहते व त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होऊन पंडुरोग संभवतो क्रमशः
 2021-02-25T06:47:07

Keywords