रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प १
“ अनिमिया ” (Anaemia )
“ अनिमिया ” – मराठी अर्थ – पंडुरोग किंवा रक्ताल्पता ( भाग २ )
मागच्या भागात आपण पंडुरोग म्हणजे नेमके काय ? त्यात कोणती लक्षणे दिसून येतात ? त्याची कारणे काय ? इत्यादी माहिती बघितली त्यापुढील भाग आता आपण बघणार आहोत .
असंतुलित आहार – यात सर्व समावेशक चौरस/सकस आहार नसेल तर लोहाचे प्रमाण घटत जावून पंडुरोग होतो . रोजच्या आहारातच लोहाचे प्रमाण कमी असणे किंवा संतुलित सकस आहाराचा अभाव हे देखील पंडुरोगाला कारण ठरते. आतड्यात ( पोटात ) जंत असणे हे देखील पंडुरोगाचे एक प्रमुख कारण आहे. ह्याशिवाय काही इतरही कारणे आहे ज्यामुळे पंडुरोग होतो यात :-
काही विशिष्ट जीवनसत्वांचा अभाव जसे फॉलिक आम्ल ( Folic Acid ) व बी – १२ जीवनसत्व ( Vitamin B 12 )
१. (सदोष ) तांबड्यापेशींचा आजार जसे थालेसेमिया, सिकलसेलचा आजार आणि इतर काही रक्तविघटनकरी पंडुरोग ( यात तांबड्या पेशी लवकर मारल्या जातात ).
या आजारांमध्ये तांबड्या पेशींची बाह्य आवरणे ( पेशी भित्तिका ) खुपच नाजूक होतात व रक्त प्रवाहातच या पेशी फुटतात व पंडुरोग होतो .
अस्थिमजातील व्याधी : - यात अप्लास्टिक अनिमिया अर्थात तांबड्या पेशीच तयार न होणे तसेच ल्युकेमिया अर्थात रक्ताचा कर्करोग ई. आजारात पंडुरोग आढळतो याचे प्रमाण खूप कमी असते मात्र यात पंडुरोग होतो हे निश्चित. इतर कारणांत, मूत्रपिंडे निकामी झाली असतील किंवा संधीवाताच्या त्रासातही पंडुरोग दिसून येतो.
पंडुरोगाच्या कारणांचा शोध व उपचार – एक साधारण रक्त तपासणी ( CBC ) ज्यात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रत्येक ( चौरस मिलीलिटर / मिलीमीटर ) मध्ये असणा-या पेशींची संख्या यातून पंडुरोग आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येते मात्र यातून मुळ कारणे सापडत नाहीत.
पंडुरोगाची काही गंभीर कारणे असतात त्यामुळे पंडुरोगाचे नेमके कारण शोधणे हिताचे ठरते . म्हणून मूळ कारणांचा शोध अशावेळी आवश्यक ठरतो व पंडुरोगाचा उपचार देखील आजारांच्या कारणांवरच ठरतो . काही लोकांना नुसत्या लोहाच्या गोळ्या देवून काम भागते , तर काहीना जीवनसत्वांचा प्रमाणबद्ध ठराविक काळ उपचार दिला जातो व हे रुग्ण बरे होतात. परंतु काही रुग्णांना अतिशय जटील उपचारांची गरज भासते .
आम्ही आपल्या पंडूरोगाच्या कारणांचा सखोल शोध घेवून तसाच उपचार सुचवतो. काही वेळा आपल्या रोगनिदानाकरता अस्थिमगज ( Bone Marrow Examination ) तपासणीचीही गरज भासते. ज्या ठिकाणी आम्हाला याची आवश्यकता वाटते तेथे आम्ही सुचवतो व करतो देखील. अस्थिमगज तपासणीची माहितीपत्रके उपलब्ध आहेत.
यापेक्षा अधिक माहितीकरता तुम्ही आमच्या चमूतील ( Group ) कुठल्याही एका सदस्याशी संपर्क साधावा .
धन्यवाद !
डॉक्टर प्रीतेश सुभाष जुनागडे
रक्तविकार व कर्करोग तज्ञ