रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प - २ ( भाग १)
लोह कमतरतेतून होणारा पंडुरोग (Iron Deficiency Anemia)
पंडुरोग म्हणजे तांबड्या रक्तपेशींची कमतरता (अपेक्षित प्रमाणापेक्षा )किंवा तांबड्या पेशींतील (सामान्य) प्रमाणापेक्षा कमी असलेले हिमोग्लोबिनचे प्रमाण .
या दोन्ही प्रकारांमुळे प्राणवायू (ऑक्सिजन ) चे रक्तातील प्रमाण कमी होते. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा पंडुरोग म्हणजे लोह कमतरतेने होणारा पंडुरोग होय. यालाच 'आयर्न डेफिसियन्सी अनेमिया' [ Iron Deficiency Anemia }असे इंग्रजीत नाव आहे.
लोह कमतरतेतून होणाऱ्या पंडुरोगाची लक्षणे कोणती?
सर्व साधारणपणे थकवा, अशक्तपणा, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, कानांत सुं-सुं (Tinnitus) असा आवाज जाणवणे ही लक्षणे आढळतात परंतु या सोबत रुग्णाला हृदयाचा आजार असेल तर दम लागणे व छातीत दुखणे ही लक्षणे देखील असू शकतात.
लोह कमतरतेतून होणाऱ्या पंडुरोगाचे निदान कसे केले जाते?
सामान्य रक्त तपासणीतून पंडुरोग आहे किंवा नाही याचे निदान होते व रक्तातील लोह तपासणीतून लोहाच्या प्रमाणाचा शोध घेऊन ते अपेक्षित पातळी प्रमाणापेक्षा कमी आढळ्यास लोह कमतरतेतून होणाऱ्या पंडुरोगाचे निदान निश्चित केले जाते.
याची कारणे कोणती ?
आपल्या रोजच्या संतुलित आहारात लोहाचे एवढे प्रमाण असते की, ज्यामुळे शरीराची लोहाची गरज भागेल. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असण्यामागे विविध कारणे आहेत. त्यातले काही साधारण तर काही गंभीर कारणे असतात ते अशी :-
१) आहार - आहारातून लोहाची कमतरता भासणे हे आपल्या देशातील प्रमुख कारण आहे. लोहाचे भरपूर प्रमाण असणाऱ्या अन्न पदार्थांत गुळ, शेपू २०% + पालक ८०% या प्रमाणात , डाळी, सुकामेवा (काजू, बदाम, आक्रोड इ.), खजूर आणि शेवटी चॉकलेटसुद्धा ! प्राणिज अन्नात (Non-Veg) देखील लोहाचे प्रमाण भरपूर असते.
२ ) अतिप्रमाणात ऋतुस्त्राव (मासिक पाळीत अत्याधिक अंगावर जाणे)
प्रत्येक १० स्रीयांपैकी १ स्रीमध्ये अधिक प्रमाणात ऋतुस्त्राव झाल्याने पंडुरोग आढळून येतो. रोजच्या आहारातून मिळणारे लोह व दर पाळीत होणारा स्त्राव यांचे प्रमाण व्यस्त होऊन पंडुरोग होतो. नुसता ऋतुस्त्राव अधिक झाला म्हणून पंडुरोग होतो असे नव्हे तर आहारातून मिळणाऱ्या लोहाचे प्रमाण अल्प असल्याने ह्या स्रिया पंडुरोगग्रस्त होतात.
३) गर्भावस्था - गर्भात वाढणाऱ्या बाळाला लोहाची आवश्यकता असते आणि ते त्याला त्याच्या आईकडून मिळते. अशावेळी आईला जर भरपूर लोहयुक्त आहार मिळत नसेल तर अशा आईला पंडुरोग निश्चित होतो. म्हणून आपल्याकडे गर्भवती स्रीयांत पंडुरोगाचे प्रमाण अधिक आढळते कारण आहारातून त्यांच्या शरीराला लागणाऱ्या लोहाची गरज भागत नाही.
४ ) कृमी / जंत
पंडुरोगाच्या महत्वाच्या कारणांपैकी आपल्या देशात पोटात जंत असणे हे प्रमुख कारण आहे हे जंत आतड्यातील रक्तावर पोसले जातात व परिणामी पंडुरोग होतो.
५ ) लोहाचे अल्पप्रमाणत होणारे शोषण - आपण खाल्लेले अन्न आतड्यात जाऊन तेथे अन्नाचा पौष्टिक भाग / घटक शोषले जातात परंतु आतड्यांतील काही आजारांत काही घटक अत्यल्प प्रमाणात शोषले जाऊन (पुरेसा आहार घेऊन सुद्धा ) पंडुरोग होतो या प्रमुख घटकांत लोह देखील आहे.
६ ) आन्त्रांतर्गत रक्तस्त्राव (आतड्याच्या आत होणारा रक्तस्त्राव )
बरेचदा आतड्यांत आतल्या आत रक्तस्राव होतो. बऱ्याच वेळा तो अचानक होतो उदा. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागातील व्रण फुटून त्यातून रक्तस्राव होणे त्यानंतर उलटीतून किंवा शौचातून रक्त दिसते.
बऱ्याच वेळा आतड्यातून जाणारे रक्त सहजासहजी लक्षात येत नाही (शौचाद्वारे) व असे थोडे-थोडे बरेच दिवस जात असते अशावेळी आहारातून मिळणाऱ्या लोहापेक्षा वाहून जात असलेल्या रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असते व पंडुरोग संभवतो. यात जठरातील व्रण, आतड्याच्या (लहान ) सुरुवातीच्या भागातील व्रण, मोठ्या आतड्याचा दाह (colitis) अन्ननलिकेची सूज, व्रण, मुळव्याध व आतड्याचा कर्करोग व इतर काही क्वचित आढळणाऱ्या आन्त्रव्याधी (आतड्यांचे आजार ). वरील आजारांपैकी कुठलाही एक आजार रुग्णाला असल्यास रुग्णाला आतड्याची काही लक्षणे जसे पोटदुखी, बद्धकोष्ठ्ता किंवा जुलाब असू शकतात. जसे की पुर्वावस्थेत या आजारांची कदाचित कुठलीही लक्षणे दिसणार नाहीत परंतु सर्वात आधी पंडुरोग दिसून येऊ शकेल.
क्रमशः