Nashik
08048036867
+917774073485

  रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ३अस्थिमगजतपासणीBon...

                  रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ३

         अस्थिमगज तपासणी (Bone Marrow TEST)

अस्थिमगज म्हणजे काय?
अस्थिमगज हे जणू घट्ट स्वरूपातील आपले रक्तच. हे शरीरातील काही हाडांच्या मध्यभागी (पोकळीत) असते व त्यातूनच पेशींची निर्मिती होते.
 
अस्थिमगज तपासणी म्हणजे नेमके काय?
यात एक पोकळ सुईने  अस्थिमगजात (हाडांच्या मध्यभागी) असलेले घट्ट रक्त सिरींजद्वारे ओढून त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केली जाते. याला अस्थिमगज संकर्षण (Bone Marrow Aspiration) असे म्हणतात . काही वेळा हा मगजाचा भाग पुढील तपासणीसाठी, निदानाला मदतस्वरूप व्हावा म्हणून बाहेरही पाठवावा लागतो. 
अस्थिमगजाची तपासणी बहुधा कमरेच्या हाडातून केली जाते परंतू छातीच्या मोठ्या हाडातून (जेथून बरगड्या उगम पावतात पुढचा भाग) तेथूनही केली जावू शकते. काही रुग्णांमध्ये अस्थिमगज तपासणीसाठी घेण्यासोबत त्याच हाडाचा एक छोटासा तुकडा     देखील तपासणीसाठी घेतला जातो त्याला ट्रीफईन (Trephine) असे म्हणतात. ह्यातून निदानाला पूरक अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.
 
तपासणीला किती वेळ लागतो?
अस्थिमगज संकर्षण प्रक्रियेला १० मिनिटे पुरतात मात्र अस्थि (हाडाचा छोटासा तुकडा) काढायला आणखी १० मिनिटे लागतात. ह्या तपासणी अगोदर विशेष पूर्वतयारी करावी लागत नाही.
 
ही तपासणी कशी केली जाते?
ही तपासणी शक्यतोवर कमरेच्या हाडाची केली जात असल्याने रुग्णाला एका कुशीवर पलंगावर (तपासणीच्या) झोपायला सांगतात. डॉक्टर तपासणीची जागा निर्जंतुक द्रवानी स्वच्छ  करतात व त्याजागी वेदना जाणवू नयेत म्हणून स्थानिक भूलींचे इंजेक्शन देतात. त्यानंतर भूल दिलेल्या जागेतून एक सुई हाडात टोचली जाते व त्यावेळी रुग्णाला काहीतरी आत ढकलले जात आहे असे जाणवते (दुखत नाही). त्यानंतर  अस्थिमगजातून द्रवरूप घट्ट पदार्थ (रक्त) सिरींजद्वारे ओढले जाते त्यावेळी थोडेसे काही सेकंदापुरते दुखल्यासारखे वाटू शकते.
जर  डॉक्टरांनी या तपासणी सोबत Trephine (अस्थि) हाडांच्या तुकड्याची तपासणी सुचवली असेल तर हा तुकडा देखील त्याच भागातून (भूल दिलेल्या) विशेष सुई द्वारे काढला जातो त्यावेळी देखील रुग्णाला आत काही तरी ढकलल्या सारखे जाणवते व किंचित दुखते. तपासणीनंतर त्याठिकाणी एक छोटीशी पट्टी लावली जाते जी रुग्णाला २४ तासापर्यंत त्याच जागी राहू द्यायची असते.
 
तपासणीनंतर......
अ  - या ठिकाणी वरच्यावर थोडेसे दुखल्यासारखे वाटेल व कालांतराने ते थांबते.
- सुई टोचलेल्या जागेतून रक्त येऊ शकते ते आपोआप थांबते न थांबल्यास त्वरित   
        डॉक्टरांना सांगावे, काळजी करत बसू नये. 
 - काही लोकांना काही दिवसांपर्यंत सुई टोचलेल्या जागेवर दुखू शकते. क्रोसिन ची गोळी 

       वेदनाशामक म्हणून घ्यायला हरकत नाही पण दिवसभरात ८ गोळ्यांपेक्षा जास्त गोळ्या   

       (क्रोसिनच्या) घेणे अपायकारक आहे.


या व्यतिरिक्त काही त्रास झाल्यास विनासंकोच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
धन्यवाद !
 

डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार कर्करोग तज्ञ)
 

 2021-03-25T05:54:13

Keywords