रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ७ (भाग २)
लिम्फोमा (Lymphoma)
लिम्फोमाच्या अवस्था कशा ठरवतात?
अवस्था निश्चितीत निदानाच्या वेळी लसिका मार्ग किती प्रमाणात बाधित झाला आहे यावर रुग्णांचे गट केले जातात व त्यावर रुग्णाच्या संभाव्यतेचा अंदाज ठरतो व उपचार द्यावा का? हे ठरते. हा आजार (DLBCL) चार अवस्थांत विभागला जातो.
सर्वात सुरुवातीची प्रथमावस्था व सर्व शरीरातल्या गाठी व अस्थिमगजाचाही आजारात समावेश होणे ही चतुर्थावस्था होय.
यावर उपचार कसे केले जातात?
यावर दर्जेदार, प्रभावी संयोगात्मक रसायनोपचार केला जातो (Chemotherapy) काही वेळा आजार जास्त मोठ्या अवयवांत किंवा शरीराच्या मोठ्या भागात व्याप्त असेल तर किरणोपचार(Radiation) (क्ष - किरणोपचार) ही द्यावा लागतो.
किरणोपचार - कर्कपेशींची अनियंत्रित वाढ थोपवण्याकरता शक्तिशाली किरणांचा मारा ह्या विकृत कर्कपेशींवर केला जातो (हे गॅमा किरण असतात.) व हा उपचार बाधित लसिका गाठींवर केला जातो याला समावेष्टीत किरणोपचार(Involved Field Radiation)असेही म्हटले जाते. बाधित भागाखेरीज ज्यावेळी आजुबाजूच्या गाठींवरही हा उपचार करतात त्याला विस्तारित भागाचा किरणोपचार (Extended Field Radiation) असे म्हणतात. किरणोपचाराचे दुष्परिणाम रुग्णावर होऊ नये म्हणून अतिशय अल्प प्रमाणात व थोड्या-थोड्या कालावधी साठी काही आठवडे हा उपचार केला जातो. आठवड्यांची संख्या ही दिल्या गेलेल्या किरणोपचाराच्या प्रमाणावर अवलंबून असते.
रसायनोपचार (Chemotherapy)/ किमोथेरपी - म्हणजे अशी रासायनिक औषधे ज्यामुळे कर्कग्रस्त पेशींची वाढ कमी करता येईल अथवा रोखता येईल. रसायनोपचारांत एक किंवा एकापेक्षा अधिक औषधांचा समावेश करतात त्याला उपचार निर्धारण (Regimen) असे म्हणतात. ज्या रुग्णांचा आजार (DLBCL) जर पुढच्या अवस्थांत पोहोचला असेल अशावेळी ४ ते ५ औषधांचा एकत्रित मारा करावा लागतो (त्याला चॉप (CHOP) किंवा चॉप - आर (CHOP -R) असे म्हणतात. ही औषधे दर ३ आठवड्यांनी ६ ते ८ आवर्तनांत (Cycles) द्यावी लागतात. ज्या रुग्णांमध्ये आजार ठराविक भागापुरता मर्यादीत असतो अशांमध्ये कमी आवर्तने व औषधोपचारासोबत किरणोपचारही त्या भागावर देवून आजार लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
मोनोक्लोनल प्रतिपिंड उपचार (Monoclonal Antibody Treatment)- मोनोक्लोनल प्रतिपिंडे ही शुद्ध प्रथिने असतात ज्यामुळे विशिष्ट पेशींवरच अचूक मारा केला जातो (खास करून कर्कपेशीच). हा ह्या औषधांचा विशेष गुण आहे कारण रसायनोपचारात कर्कपेशींसोबत इतर चांगल्या निरोगी पेशींचीही वाढ खुंटते. ह्या औषधाचे तुलनात्मकदृष्ट्या कमी दुष्परिणाम आहेत व नंतर चे ही दुरगामी धोके नेहमीच्या रसायनोपचारांपेक्षा कमी आहेत. रिटक्सीमॅब (Rituximab) हे एक मोनोक्लोनल प्रतिपिंड औषध आहे व DLBCL च्या रुग्णांत वापरले जाऊ शकते. हे बहुधा इतर रसायनोपचारातील औषधांसोबत दिले जाते.
अस्थिमगज रोपण (Bone MarrowTransplant)- ज्यांचा आजार (Lymphoma) एकदा बरा होवून पुन्हा उलटून आला आहे अशांसाठी विचारात घ्यावा लागतो.
या आजारग्रस्तांचे भवितव्य काय? (Prognosis / Outcome)
ह्या प्रश्नाचे प्रत्येक रुग्णात उत्तर वेगवेगळे असते ते रक्तकर्क उपचारतज्ञ उपचार करण्याआधीआपल्याला जरूर देतीलच.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कर्करोग तज्ञ)