Nashik
08048036867
+917774073485

रुग्ण जागृती ज्ञानमाला पुष्प – १५ स्टेरॉई...

रुग्ण जागृती ज्ञानमाला पुष्प – १५ स्टेरॉईड प्रकारच्या औषधांचे दुष्परिणाम [ Side Effects of Steroids ] स्टेरॉईड प्रकारची औषधे बऱ्याच वेळा विविध व्याधींच्या रुग्णांना विविध डॉक्टर देत असतात. काही वेळा ही तात्पुरत्या कारणासाठी उदा. एखाद्या औषधाचा , ऍलर्जीचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी देतात, कधी एखाद्या ठिकाणची सूज कमी व्हावी म्हणून असे एक ना अनेक कारणांसाठी वैद्यकीय क्षेत्रात गरजेनुसार डॉक्टर यांचा वापर करतात. हे जसे प्रभावशाली असतात तसेच यांच्या प्रदीर्घ वापराने काही दुष्परिणाम देखील होत असतात. परंतु दुर्देवाने काही विशिष्ट आजारात यांचे दीर्घ काळापर्यंत रुग्णाला सेवन करणे भाग पडते व डॉक्टरांनाही दिल्याशिवाय गत्यंतर नसते. थोडक्यात, स्टेरॉईड औषधे ही दुधारी शस्त्रांसारखी असतात त्यामुळे त्यांचा वापर डॉक्टरांनी निश्चित केलेल्या प्रमाणात व ठरवलेल्या कालमर्यादेतच घेणे इष्ट ठरते. आता मी रक्तविकार तज्ञाच्या भूमिकेतून यांचे दुष्परिणाम समजावून सांगणार आहे. उपरोक्त माहिती वरून आपल्या लक्षात आलेच असेल की, कित्येक व्याधी विकारात मला स्टेरॉईड चा उपचार दीर्घ काळासाठीही सुचवावा लागतो. त्यामुळे याचे दुष्परिणाम माहित असलत्यास स्टेरॉईड बद्दलची भीती व गैरसमज दूर होतील अशी आशा आहे. स्टेरॉईडचे दुष्परिणाम आता आपण ठळक मथळे देऊन जाणून घेऊ या. १. शारीरिक तणावाची संवेदना कमी होणे [Altelrlleld response to physical stress] जर कोणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ स्टेरॉईड औषधे घेत असेल तर ती थांबविल्यानंतर पुढेही अनेक दिवस या व्यक्तींना सामान्यत: जाणवणारी ताण -तणावाची संवेदना इतर सामान्य व्यक्तीं इतकी जाणवत नाही . २. स्टेरॉईड औषधे अचानक थांबविल्याने निर्माण होणार लक्षण समुच्चय [Steroid withdrawal syndrome] दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ घेत असलेली स्टेरॉईड प्रकारची औषधे घेणे अचानक थांबविल्यास विविध लक्षणे या व्यक्तीत दिसून येतात यात प्रामुख्याने थकवा , सांधेदुखी, स्नायू आखडणे किंवा स्नायू दाबल्यावर दुखणे इत्यादी. काही वेळा ताप देखील येतो. ही लक्षणे मुळ आजाराची की, स्टेरॉईड थांबविल्यामुळे निर्माण झालेली आहे हे ठरविणे खूप अवघड असते. त्यामुळे स्टेरॉईड प्रकारची औषधे घेणे कधीही अचानक थांबवू नयेत. त्या ऐवजी ती हळु -हळु कमी करावी लागतात व ते तज्ञ करतातच . ३. जंतू संसर्ग [ Infection ] प्रदीर्घ काळ स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांच्या प्रतिकार यंत्रणेचे दमन होते. [Suppression] त्यामुळे जंतू संसर्गाचा [Infection] धोका देखील वाढतो. ४. जठर व आतड्यांतील व्रण व रक्तस्त्राव [Gastrointestinal ulcer bleeding] स्टेरॉईडमुळे जठर व आतड्यांत व्रण [Ulcer] होण्याचा व त्यातून रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो ते ही विशेषतः जर या सोबत स्टेरॉईड रहित वेदना शामक प्रकारची [NSAIDs] औषधे घेण्यात आली , तर हा धोका अधिकच वाढतो. यात उदा . आयुबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिन प्रकारची औषधे असणं-या वेदना शामक गोळ्या घेतल्यास व्रणांसोबत रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. धन्यवाद ! क्रमशः डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे रक्तविकार व कँसर तज्ञ
 2022-01-13T10:16:18

Keywords