रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प– १७ (भाग -१)
‘ ब -१२ ’ जीवनसत्वाच्या कमतरतेने होणारा पंडुरोग
‘ब -१२’ या जीवनसत्वाच्या अभावाने होणारा पंडुरोग म्हणजे काय ?
शरीराच्या जडण घडणीत व विविध कार्य सुरळीतपणे होण्यासाठी जीवनसत्वांचे महत्व अनन्य साधारण आहे . यात ‘ ब ’ प्रकारच्या अनेक जीवन सत्वातील एक प्रकार ‘ ब -१२ ’ हे जीवनसत्व आहे. या जीवनसत्वामुळे तांबड्या पेशींची निर्मिती होते व शरीराच्या इतरही विविध पेशी निर्मितीत या जीवनसत्वाचा महत्वाचा सहभाग असल्याने हे जीवनसत्व नावाप्रमाणेच जीवनावश्यक आहे. हे आपल्याला प्राणीजन्य पदार्थ [दुध ] किंवा मांसाहारी पदार्थातूनच मिळते. फळे , भाजीपाला यातून ते मिळत नाही. आपल्या रोजच्या जेवणातून [ संतुलित आहार Balanced Diet ] पुरेशा प्रमाणात हे मिळते परंतु याच्या कमतरतेने किंवा ब-१२ जीवनसत्वरहित आहारामुळे तांबड्या पेशी निर्मितीची क्षमता रोडावते व पंडुरोग होतो तोच ब-१२ जीवनसत्वाच्या कमतरतेने होणारा पंडुरोग होय . [ अंडी , मटण, मासे तसेच दुध या प्राणीजन्य पदार्थातुनच ब- १२ जीवनसत्व मिळते ]
‘ब -१२’ या जीवनसत्वाच्या कमतरतेने होणारया पंडुरोगात कोणती लक्षणे दिसून येतात ?
तांबड्या पेशींची सख्या घटल्याने व परिणामतः शरीरातल्या सर्वच पेशींना प्राणवायूचा [ oxygen] पुरेसा पुरवठा न झाल्याने ही लक्षणे दिसतात.
यात – थकवा , गळल्यासारखे वाटणे, गरगरणे [ तोल जाईल असे वाटणे ] व थोड्याशा श्रमानेही धाप लागणे ही लक्षणे बरेचदा दिसतात.
काही कमी प्रमाणात दिसून येणाऱ्या लक्षणांत डोके दुखणे , छातीत धडधडणे , चवीत बदल होणे व कानात घंटानादासारखा आवाज येणे [ tinnitus ] ही लक्षणे दिसतात.
वर सांगितलेल्या लक्षणाखेरीज काही रुग्णात खालील लक्षणेही दिसून येतात.
ब -१२ जीवनसत्वाच्या अभावाने शरीराच्या इतर अवयवातही विविध लक्षणे दिसून येतात. यात वारंवार तोंड येणे, जिभेला फोड येणे ही लक्षणे दिसल्यावरही उपचार न केल्यास मज्जातंतुंशी निगडीत समस्या उदभवू शकतात. उदा. गोंधळणे , बधीरपणा जाणवणे स्थिर उभे न राहता येणे इ. ही लक्षणे क्वचितच आढळतात कारण यावरचा उपचार साधा व सोपा असतो कारण या सर्व लक्षणांआधी पंडुरोग आढळतो. त्यावर उपचार व्यवस्थित झाला म्हणजे इतक्या टोकाची लक्षणे आपोआपच दिसणार नाहीत.
‘ ब -१२ ’ जीवनसत्वाच्या कमतरतेची कारणे कोणती ?
जठर व आतडी यांची समस्या :-
शस्त्रक्रियेद्वारे जर पोटाचा किंवा आतडीचा काही भाग काढण्यात आला असेल तर ब-१२ जीवनसत्व पुरेशा प्रमाणात न शोषले गेल्याने [आहारातून घेऊन देखील ] त्याची कमतरता आढळते . याशिवाय ‘क्रोन्स’ च्या आजारात ब-१२ जीवनसत्व शोषणारा भाग बाधित होतो. ज्याचा परिणाम होऊन ब-१२ जीवनसत्वाची कमतरता होते.
क्रमशः
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)